मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करा, भाजपाची मागणी
मनसुख हिरेन प्रकरणी भाजपाने सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. मनसुख हिरेन मृत्यू् प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करीत असून चौकशीत दबाव येऊ नये यासाठी त्यांना निलंबित करावे किंवा त्यांची मुंबईबाहेर बदली करण्याची मागणी भाजपाने केली आहे.
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मुंब्र्यातील रेतीबंदर खाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यामागे कोण आहे याचा तपास करा, अशी मागणी भाजपाने केली होती. नंतर या प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत त्यांच्या अटकेची मागणीही करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर वझे यांची दोनदा बदली करण्यात आली. याचदरम्यान त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. 'मनसुख हिरेन हत्या प्रकरणातले प्रमुख संशयित सचिन वाझे अद्याप मुंबई पोलिसांच्या सेवेत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त त्यांच्याशी दोन तास चर्चा करतात, हे धक्कादायक आहे. चौकशीसाठी दबाव येऊ नये म्हणून त्यांना तत्काळ निलंबित करा किंवा त्यांची किमान मुंबईबाहेर बदली तरी करा,' अशी मागणी त्यांनी ट्विटरवरून केली आहे.