Basavaraj Bommai | बसवराज बोम्मई घेणार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाची माळ बसवराज बोम्मई यांच्या गळ्यात पडली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली आहे. उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता बसवराज बोम्मई मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाने नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज संध्याकाळी बेंगळुरू येथे भाजपने विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. भाजपच्या पक्षश्रेष्ठीनी नवी दिल्लीतील वरिष्ठ नेते पाठविले असून ते या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याप्रमाणेच नवीन मुख्यमंत्रीदेखील राजकीयदृष्ट्या प्रभावी लिंगायत समुदायाचे आहेत.
दरम्यान येडियुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. "कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे" अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.