Anil Deshmukh: सचिन वाझेकडून खळबळजनक खुलासा; पोलीस दलात पुन्हा येण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी
१०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. कारण आता सीताराम कुंटे यांच्यानंतर सचिन वाझे यांनीही अनिल देशमुखांविषयी ईडीला महत्वाची माहिती दिली आहे.
अनिल देशमुख यांनीच मला पोलीस दलात पुन्हा येण्याविषयी सुचवले. राज्य सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते यासाठी तयार नव्हते. मात्र, मी त्यांना समजवेन, असे अनिल देशमुख यांनी मला सांगितले होते. तसेच पोलीस दलात पुन्हा येण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणीही अनिल देशमुख यांनी केली होती. परंतु, मला इतके पैसे देणे शक्य नसल्याचे मी अनिल देशमुख यांना कळवले होते. तरीही अनिल देशमुख यांनी मला परमबीर सिंह यांच्याकडे पोलीस दलात पुन्हा रुजू होण्यासाठीचा विनंती अर्ज देण्यास सांगितले. त्यानंतर मी अनिल देशमुख यांच्या मर्जीप्रमाणे पोलीस दलात पुन्हा रुजू झालो, असे सचिन वाझेंनी सांगितले.
अनिल देशमुख यांनी मला बार आणि रेस्टॉरंटसकडून वसुली करण्यास सांगितले. त्यानंतर मी डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०१२१ या काळात अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख रुपये दिले. हे सर्व पैसे अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे याच्या माध्यमातून पोहोचवण्यात आल्याचे वाझेंनी सांगितले.