Green Tomato Benefits: जाणून घ्या हिरवे टोमॅटो खाण्याचे फायदे

shweta walge

टोमॅटो खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण आतापर्यंत तुम्ही फक्त लाल टोमॅटोचे फायदे ऐकले असतील. पण तुम्हाला हिरव्या टोमॅटोचे किंवा कच्चा टोमॅटोचे फायदे माहीत आहेत का? जाणून घेऊ हिरवे टोमॅटो खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे.

हिरव्या टोमॅटोमध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हिरवे टोमॅटो खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळं लवकर आजारी पडण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी होतो.

हिरव्या टोमॅटोमध्ये जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतं. हिरव्या टोमॅटोचं सेवन केल्यानं रक्त गोठणं कमी होतं. म्हणजेच हिरवा टोमॅटो रक्ताच्या गुठळ्या सामान्य करून रक्त पातळ करण्यास मदत करतो.

हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असते जे दृष्टी वाढवण्याचे काम करतात. तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या टोमॅटोची चटणी किंवा सॅलडचा समावेश करून तुम्ही तुमची दृष्टी मजबूत करू शकता.

हिरवे टोमॅटो त्वचेसाठीही फायदेशीर असतात. ते खाल्ल्यानं वृद्धत्वाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी खूप चांगल्या प्रमाणात आढळतं, ज्यामुळं त्वचेच्या पेशी नव्यानं तयार होत राहतात आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

हिरवे टोमॅटो रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करतात. ज्यांचा रक्तदाब खूप जास्त राहतो, त्यांच्यासाठी हिरवे टोमॅटो खाणं खूप फायदेशीर आहे. कारण, हिरव्या टोमॅटोमध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त आढळतं.