26 जुलै 2005 ची आठवण आली की मुंबईकरांच्या अंगावर आजही शहारे येतात. त्या दिवशी मुंबई ठप्प झाली होती. 24 तासांत तब्बल 944 मिलीमीटर पाऊस झाला. मुंबईमध्ये पावसाळ्यात साधारण 2400 मिमी पाऊस पडतो. त्यावरून 26 जुलैला पावसाची तीव्रता लक्षात यावी. आता 17 वर्षानंतर मुंबई अशा परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहे का? पाहू या लोकशाहीचा स्पेशल रिपोर्ट...
26 जुलै 2005 रोजी मुंबईत ढगफुटीने थैमान घातले होते. सर्व शहर पाण्यात बुडवले होते. आज जी मुले किशोरअवस्थेत आहे, त्यांना त्या दिवशी नेमके काय झाले हे कदाचित नीट माहीत नसेल. 25 जुलैच्या रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार सरी कोसळत होत्या.
मुंबईकरांना पाणी तुंबणे, रेल्वे बंद पडणे, रस्ते वाहतूक ठप्प होणे नवीन नाही. परंतु त्या दिवसाचा पाऊस तोंडचे पाणी पळवणारा होता. मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील इमारती, वस्त्यांमध्ये पाणी घुसून लक्षावधी लोकांचे संसार वाहून गेले होते. या जलप्रलयामध्ये 456 नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो गुरं दगावली. जवळपास वीस हजार गाड्या, बेस्टच्या 2500 बसेस आणि हजारो दुचाकींचं नुकसान झालं होते. खासगी व सरकारी मालमत्तांचंही कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. पूर ओसरल्यानंतर जागोजागी साचलेल्या दोन लाख टन कचऱ्याचा मुंबई मनपाने निपटारा केला. तब्बल 24 टन ब्लीचिंग पावडरचा वापर शहरात रोगराई पसरु नये म्हणून करण्यात आला.
निद्रीस्तावस्थेतील मिठी नदी कोपल्याने मुंबई बुडाली होती. उपनगरात ठाण्याच्या पुढे मुंब्रा-दिवा दरम्यान रेल्वेमार्ग वाहून गेला होता. रेल्वेसेवा पूर्ववत होण्यासाठी तब्बल 10 ते 12 दिवस लागले होते.
आपण धडा घेतला का?
मुंबई बुडाल्यानंतर साहजिकच चौकशी समितीचे सोपस्कार झाले. मिठी नदीच्या पात्रातील अतिक्रमणे काढण्याची घोषणा झाली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी तर युरोपातील काही देशांत शहराच्या मधून वाहणाऱ्या नदीच्या दुतर्फा जसे बगिचे, वॉकिंग व सायकलिंग ट्रॅक असतात तसे ते उभे करण्याचे स्वप्न दाखवले होते. परंतु आज अनेक भागातील अनधिकृत बांधकामे काढण्यात अपयश आल्याने दिसत आहे. मिठी नदी जैसे थे राहिली आहे. 1991 च्या सीआरझेड कायद्यानुसार शासकीय यंत्रणांना नदीच्या पात्रापासून 100 मीटर परिसरात कुठलेही बांधकाम करायला बंदी आहे. परंतु अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली. यामुळे पुन्हा 26 जुलै 2015ची पुनरावृत्ती होऊ नये हीच तर प्रार्थना मुंबईकरांना करावी लागणार आहे. कारण 17 वर्षांपूर्वीच्या आपत्तीतून काडीमात्र धडा आपण घेतलेला नाही, हे वास्तव आहे.