विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आज (सोमवार) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. यावेळी राज्यातील अनेक बंडखोर उमेदवारांना समजवण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आले आहे. मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी अचानक माघार घेतली आहे. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
त्यानंतर जिल्ह्याचे काँग्रेस नेते सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. ते म्हणाले की, मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप करत मला तुम्ही तोंडघशी पाडलतं, असा आरोप सतेज पाटील यांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यावर केला. 'दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद' असं म्हणत सतेज पाटलांनी त्यांचा राग व्यक्त केला.
सुरूवातीला काँग्रेसने माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या नावाला अनेक नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर मात्र काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. त्या ठिकाणी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आता बदललेल्या उमेदवारानेच अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील मात्र चांगलेच भडकले आहेत.