महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निकालावर भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. तर महाविकास आघाडीला ४६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आहे. निकाल पटला नाही तरीही निकाल लागला आहे. महाविकास आघाडीला मत देणाऱ्या जनतेचे आभार त्यांनी मानले आहेत.
निकालाची आकडेवारी पाहता सरकारला एखादं बील पास करायचं असेल तर ते सभागृहात ठेवायची गरजच नाही. भाजपला देशात विरोधीपक्ष शिल्लकच ठेवायचा नाही. जे. पी. नड्डा म्हटले होते, वन नेशन, वन इलेक्शन, वन पार्टी करण्याचा डाव आहे. जनतेने महायुतीला मतं का दिली? हा सवाल आहे. महाराष्ट्रातील जनतेला हा निकाल मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
महायुतीच्या लाटेपेक्षा जणू काही त्सुनामी आल्याचे पाहायला मिळाले. लाट उसळल्यासारखं महायुतीने काय काम केलं आहे? कोणत्या रागापोटी ही लाट उसळली आहे हे अनाकलनीय आहे.
'मोदी-शहा यांच्या सभेतून लोकं उठून जात होती, असा निकाल येणं अपेक्षित नव्हतं'
आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभांना गर्दी नसल्याचे, खुर्च्या रिकामी असल्याचे फोटो, व्हिडिओ समोर येत होते. जणू काही मोदी यांच्या सभांना न जाता आम्ही भाजपला निवडून आणणार असल्याचे त्यांनी ठरवलं होतं.
'ईव्हीएमचा विजय असल्याचे काहींचे म्हणणे'
सोयाबीनला भाव नाही, कापूस खरेदी नाही, बेरोजगारी वाढली आहे, महिला असुरक्षित आहेत, महागाई वाढते आहे. तरीही जनतेने महायुतीला मत का दिलं हा संशोधनाचा विषय आहे.
आता तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल का?
आता तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल का? म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहिण योजना आता त्यांना पुन्हा सुरू करावी लागणार आहे. कोरोना काळात कुटुंबप्रमुख म्हणून माझं ऐकणारा महाराष्ट्र असा कसा वागेल याचा ताळमेळ लागत नसल्याची खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. अडीच वर्षात आमचे चिन्ह आणि नाव त्यांना देऊन निवडणूक घेतली जाते इथेच मोठी गफलत आहे. लोकसभा निवडणुकीचा ४ महिन्यांपूर्वी लागलेल्या निकालानंतर विधानसभेमध्ये महायुतीला बहुमत मिळणं प्रश्न उपस्थित करणारं आहे. ४ महिन्यात महायुतीने असं काय केलं की जनतेने निवडून आणलं. असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
तुमचा बंगला कोणता हे निवडा? ठाकरेंचा शिंदेंना टोला
देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करावं लागणार असल्यामुळे आता तुमचा बंगला कोणता हे निवडा असा सवाल विचारत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.