महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचारसभा सुरु आहेत. प्रचारसभांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. लातुरातील औसा येथे उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेत महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस चक्रव्यूहात अडकले
देवेंद्र फडणवीस आता स्वत: च चक्रव्यूहात अडकले आहेत. पुन्हा येईन, पुन्हा येईन, म्हणता म्हणता, आले. मात्र, आधी फूल होते आता हाफ होऊन आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत आपल्याला वचन दिल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला आहे.
"अजित पवारांनी भांडी घासायला माती द्यावी..."
महायुतीची सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं असल्याचं सांगत ठाकरेंनी महायुतीतीत घटक पक्षाचा चांगलाच समाचार घेतला आहे. "बसा आता भांडी घासत. अजित पवारांनी भांडी घासायला माती द्यावी. घास रे बाबा भांडी घास." असं म्हणत डिवचलं आहे.
देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ, तिघं मिळून महाराष्ट्र लुटून खाऊ
देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ तिघं मिळून महाराष्ट्राला लुटून खाऊ हे यांचं धोरण आहे. मिंधेंनी तर ताळतंत्र सोडून दिलं आहे. जाऊ तिथे खाऊ हेच त्यांचं धोरण आहे. दीड वर्षापूर्वी पंतप्रधान आले होते आणि रस्त्याच्या कामांचा शुभारंभ केला. आपण केलेल्या कामांवरच ते नारळ फोडले. ते काम किती हजार कोटींनी वाढलं ते बघा. सगळे पैसे एकनाथ शिंदेंच्या कंत्राटदारांच्या खिशात जात आहेत. तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य दरोडेखोरांच्या हाती देणार की निष्ठावान मावळ्यांच्या हातात देणार? महाराष्ट्र काय म्हणून ओळखला गेला पाहिजे शिवरायांचा स्वाभिमानी महाराष्ट्र की अदाणीचा लाचार महाराष्ट्र हे तुम्ही ठरवायचं आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र मोदी-शाह यांना दिल्लीत बसून हाकता येणार नाही
महाराष्ट्र दिल्लीत बसून मोदी-शा यांना हाकता येणार नाही हे लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी औसा येथून भाजपाला ठणकावलं. मोदी आणि शाह महाराष्ट्र संपवायला निघाले आहेत. महाराष्ट्र लुटण्याच्या आड कुणी येऊ शकत असेल तर ती फक्त हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे. त्यांनी शिवसेनेवर घाव नाही घातलेला तर महाराष्ट्राच्या मूळावर घाव घातला आहे अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.