महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात महायुती सरकार स्थापन करणार आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जनतेचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं आहे.
थोडक्यात
महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड
28पेक्षा जास्त आमदार नसल्यानं विरोधी पक्षनेतेपद नसणार
2024 ते 2029 या काळात मविआकडे विरोधी पक्षनेता नसणार
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला जोरदार यश मिळालं आहे. मात्र मविआचा दारुण पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्राला 2024 ते 2029 या काळात विरोधी पक्षनेता देखील मिळणार नसल्याची चिन्ह आहेत. विरोधी पक्षनेता पद मिळवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक दशांश आमदार संख्या असणं आवश्यक आहे. म्हणजे 28 पेक्षा जास्त आमदार ज्या पक्षाकडे आमदार असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष 28 ची संख्या पार करण्याची शक्यता कमी असल्यानं विरोधी पक्षनेतेपद देखील राज्याच्या विधानसभेत नसणार अशी शक्यता आहे.
महायुतीने तब्बल २३५ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार २८८ पैकी २३६ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीमध्ये भाजपाला १३७, शिवसेनेला (शिंदे) ५८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १५ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड झालं आहे.