महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानप्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यात जास्तीत जास्त मतदान केलं जावं यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये गोंधळ पाहायला मिळाला आहे. नांदगाव विधानसभेत तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आहे.
थोडक्यात
सुहास कांदेंची समीर भुजबळांना धमकी
'तुझा मर्डर फिक्स' म्हणत पोलिसांसमोर धमकी
नांदगाव विधानसभेत तणावाचं वातावरण
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती
नेमकं काय घडलं?
सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं. समीर भुजबळ आणि आ. सुहास कांदे समोरासमोर आले. नांदगाव - मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांना समजावण्याचा प्रयत्न केला. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तसेच कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे.
नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार सुहास कांदे यांनी मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ व सुहास कांदे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तसेच कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या रस्त्यावर शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांची गुरुकुल शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेच्या बाहेरच प्रसारमाध्यमं व पोलिसांसमोर कांदे व भुजबळ भिडल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेनंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच समीर भुजबळ यांनी ‘गुरुकुल’बाहेर काय घडलं याबाबत माहिती दिली आहे.
समीर भुजबळ म्हणाले, “मी रस्त्याने जात होतो. तिथे मला काही बसेस, टेम्पो, ट्रक उभे असलेले दिसले. मी ते पाहण्यासाठी आत गेलो. तिथे स्थानिक आमदाराची शाळा आहे. तिथे हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आलं होतं. ते सगळं पाहून मी पोलिसांना फोन केला. निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार केली. मी त्यांना सांगितलं की तिथे हजारो लोकांना डांबून ठेवण्यात आलं आहे. पैसे वाटण्याचे काम चालू होतं, लोकांना जेवण दिलं जातं होतं, खानावळी चालू होत्या, हे सगळं पोलिसांना कळायला हवं होतं. मात्र, त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही. तेवढ्यात आमदार महाशय तिथे आले आणि ते थेट माझ्या अंगावर धावून आले. मला जीवे मारण्याची धमकी देत होते, त्यांनी मला शिवीगाळही केली. पोलीस मात्र हे सगळं निमूटपणे बघत बसले होते. त्यांच्याबरोबर (आमदार) आलेले गुंड जे तडीपार आहेत ते मला मारायचा प्रयत्न करत होते. मी त्यांची नावं पोलिसांना दिली आहेत. परंतु, पोलिसांनी अद्याप त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही.