बोरिवली मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना 107238 मते मिळाली आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संजय भोसले रिंगणात होते. त्यांना 32076 मते मिळाली आहेत. ही अठराव्या फेरीतील टक्केवारी आहे. अपक्ष उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे संजय उपाध्याय यांना पूर्ण पाठिंबा मिळाला.
बोरिवली मतदारसंघात उमेदवारीवरून हायव्हॉल्टाज ड्रामा पाहायला मिळाला होता. त्यामुळे या मतदारसंघातून कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. गोपाळ शेट्टी यांना भाजपकडून डावलून संजय उपाध्याय यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शेट्टी नाराज होते. बोरिवलीतून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र अखेरीस त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना डावलून संजय उपाध्याय यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने गोपाळ शेट्टी कमालीचे नाराज झाले होते. यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना डावलून पियुष गोयल यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. आणि आता विधानसभेत सुद्धा उमेदवारी डावलल्यामुळे गोपाळ शेट्टी आता बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार होते. 'निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असून पक्षाने केलेली चूक आपण दुरुस्त करत आहोत' अशी खरमरीत प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिली होती. 'संजय उपाध्याय यांच्या बद्दल आपलं वाईट मत नाही. आणि मी पक्ष सुद्धा सोडलेला नाही. मात्र, वारंवार माझ्यासोबत अशाप्रकारे वर्तणूक झाल्यामुळे आपण हे अपक्ष निवडणूक लढवण्याचे पाऊल उचलले असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, अखेरीस त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती.