महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. सामान्य जनतेला एका परिवर्तानाचा नवा पर्याय म्हणून संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पुण्यातील जाहीर सभेत त्यांनी विस्थापितांना ताकद आणि अन्यायग्रस्तांना न्याय देणं हेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केलं आहे.
थोडक्यात
"राजकीय घरणेशाहीविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष"
"धर्माच्या नावावर राजकारण करत विकासाच्या मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष"
"विस्थापितांना ताकद आणि अन्यायग्रस्तांना न्याय देणं हेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उद्दिष्ट"
संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य
परिवर्तन महाशक्तीतील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील कॅंटॉन्मेंट मतदारसंघाचे उमेदवार यशवंत नडगम, कसबा उमेदवार ओंकार येनपुरे, पुरंदर विधानसभेचे उमेदवार सुरज घोरपडे, शिरूर विधानसभेचे उमेदवार विनोद चांदगुडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत संभाजीराजे छत्रपती बोलत होते. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघातील कॉँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार मनीष आनंद, कोथरूड विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय डाकले यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
"राजकीय घरणेशाहीविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष"
संभाजी राजे छत्रपती आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, "एकाच घरात तीस-तीस, चाळीस-चाळीस वर्षे सत्ताकेंद्र आहेत. या राजकीय घरणेशाहीविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष उभा आहे. त्यामुळे विस्थापितांना न्याय देणं आणि ज्या सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हीच स्वराज्य पक्षाची भूमिका आहे.
"विकासाच्या मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष"
धर्माच्या नावावर राजकारण केलं जात असून विकासाच्या मुद्द्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचेही संभाजीराजे छत्रपती आपल्या भाषणात म्हणाले. पैसे देऊन लोकांची मते विकत घेणं ही लोकशाहीची थट्टा आहे. रोजगार निर्मिती, शिक्षणाचा उत्तम दर्जा, पायाभूत सुविधांचा विकास, उत्तम आरोग्य सुविधा यावर कुणीच बोलायला तयार नाही. या सगळ्या घाणेरड्या राजकारणात विकासाच्या मुद्द्यावर भर देत एक सक्षम राजकीय पर्याय म्हणून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोकांनी साथ द्यावी असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.