विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर अनेक पक्षातील नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्जही भरला आहे.
अशातच कॉंग्रेस पक्षाचे नेते आबा बागुल हे पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज भरला असून कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भुमिका बागुल यांनी घेतली आहे. आबा बागुल यांच्याकडून मतदारसंघात प्रचाराला सुरुवातदेखील झाली आहे. शहरातील काँग्रेस भवनापासून प्रचाराचा शुभारंभ करत महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत प्रचाराला सुरुवात केली आहे.
आश्वासन देऊनही कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याचा आरोप बागुल यांनी केलाय. तर अजूनही वेळ गेली नाहीय, मला पुरस्कृत उमेदवार करा अशी विनंतीदेखील आबा बागुल यांनी काँग्रेस पक्षाकडे केलीये.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून मविआकडून अश्विनी कदम तर महायुतीकडून माधुरी मिसाळ यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलीये. तसंच सचिन तावरे यांनी शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि आता आबा बागुलदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.