थोडक्यात
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
धुळे,नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची प्रचारसभा
मोदींच्या सभेमुळे सभास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज धुळे, नाशिकमध्ये प्रचारसभा होणार आहे. या सभेसाठी राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते, महायुतीतील नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची ही पहिली प्रचारसभा होणार असून धुळ्याच्या गोशाळा मैदान परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत तर यानंतर नाशिक शहरातील तसेच जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या तपोवन मैदानात जाहीर सभा होणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून सभास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.