महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विविध पक्षांच्या प्रचारसभेमुळे निवडणुकीला रंगत आली आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळत आहे. आज अकोला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. तसेच आजचा दिवस ऐतिहासिक असल्याची आठवण करून दिली. आजच्या दिवशी राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायलाने दिला होता. त्यामुळे 9 नोव्हेंबर हा दिवसा महत्वाचा असल्याची त्यांनी आठवण करून दिली आहे. सन 2014 ते 2024 या दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये भाजपला भरभरून प्रेम मिळाले. केंद्रातील सरकारला 5 महिने पूर्ण झाले आहेत. देशातील सर्वात मोठे पोर्ट वाढवण येथे असेल त्यासाठी 80 हजार कोटींची तरतूद आहे. गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे बनवली आहेत. महाराष्ट्रातील जनतेलाही पक्की घरांचे आश्वासन मोदी यांनी दिले आहे. जर कुणी कुटुंब झोपडीत राहत असेल तर मला कळवा. त्यांना पक्कं घर देण्यार आहोत. आयुषमान कार्ड योजनेचा लाभ 70 वर्षावरील सिनियर सिटीझन्सना मिळणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर खरपूस टीका केली आहे. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार येते ते राज्य काँग्रेसच्या शाही परिवारासाठी एटीएम बनते. हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक सारखे राज्य काँग्रेसचे एटीएम बनले आहेत. कर्नाटकात दारूच्या दुकांनाकडून काँग्रेसने 700 कोटींची वसूली केली आहे. महाराष्ट्राला महाविकास आघाडीचे एटीएम बनून देऊ नका असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
एक हे तो सेफ है...
काँग्रेसने स्वातंत्र्यांनंतर एसटी, एससीमधील दलित समाजाला, आदिवासी, ओबीसी समाजाला एकत्र येऊ दिलं नाही. समाजातील जातींमध्ये फूट पाडण्याचे काम केले. ज्यामुळे काँग्रेसचे सरकार प्रस्थापित होण्यास मार्ग मोकळा होणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. हरियाणातील नागरिकांनी जसे काँग्रेसला हद्दपार केले तसे महाराष्ट्रातूनही करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.