अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची बैठक सुरु होती. विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्याचे काम या बैठकीत सुरु होते. बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रात 15-20 जागा लढणार असल्याची माहिती दिली आहे.
मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांसोबत अद्याप चर्चा सुरु आहे. अजून अनेक मतदारसंघांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. असं असलं तरी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज रात्रीत किंवा उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार? याबाबतची भूमिका स्पष्ट केली. “मोजक्याच जागा लढायचं ठरवलं आहे आणि त्या निवडून आणायचं सुद्धा ठरवलं आहे. आपण 15 ते 20 जागांवर लढायचं आहे आणि उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.