महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. महायुती आघाडीवर असल्यामुळे राज्यात महायुती सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जनतेचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं होतं.
महाराष्ट्रातील महानिकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं होतं. महायुतीचा प्रचंड बहुमताने विजय जवळपास निश्चित झाला आहे. महायुतीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. महायुतीतर्फे राज्यातील जनतेचे आभार मानण्यात आले.
महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक दिवस: मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग दंडवत केलं आहे. गेल्या २ वर्षात केलेल्या कामाची ही पावती आहे. अडिच वर्षात मविआ सरकारने जी कामं बंद पाडली होती. ती कामं आम्ही सुरू केली. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मेट्रो यासारखी कामांचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलं. राज्याच्या सर्वांगीण विकासावर आम्ही भर दिला. राज्यातील सर्वच घटकांच्या विकासाकडे लक्ष दिलं. जनतेच्या कल्याणासाठी योजना आणल्या. लाडकी बहिण, युवकांसाठी रोजगार, वयोश्री योजना, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना आणल्या. राज्याला पुढे न्यायचं हाच उद्देश होता. राज्यातील प्रत्येक घटकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारही महायुतीच्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे डबल इंजिनच्या सरकारमुळे वेगवान निर्णय आणि कामं करता आली. राज्यातील जनतेला सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आम्ही कामं केली. अनेक प्रकारचे आरोप झाले. लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टातही गेली. शासन आमच्या दारी योजनेच्या माध्यमातून ५ कोटी जनतेला लाभ झाला. त्यामुळे महायुती सरकार हे देणारे सरकार आहे यावर लोकांचा विश्वास झाला. आम्हाला माहित होतं, विरोधक हे सावत्र भाऊ आहेत, विरोधक योजना बंद पाडतील म्हणून आम्ही आधीच नोव्हेंबरचा हफ्ता दिला. लोकांनी कल्याण आणि विकासाच्या राजकारणाचा विजय केला. लोकसभेमध्ये लोकांनी फेक नॅरेटिव्ह पसरूवूनही केंद्रात मोदी सरकारच स्थापन झाले. आम्ही आरोपांना कामातून उत्तर दिलं. घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही. आम्ही घेतलेला एकही निर्णय कागदावर राहिला नाही. सगळ्या योजना कार्यान्वित केल्या.