महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात महायुती सरकार स्थापन करणार आहे. साल २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाचे असलेले दोन पक्षांना फुटीचा सामना करावा लागला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जनतेचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं होतं. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे.
थोडक्यात
मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनमानसात पोहोचविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा
लोकांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त पसंती दिली होती
निवडणूकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा अग्रसेर
महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार ही चर्चा सुरू असताना आता मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनमानसात पोहोचविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे. लोकांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त पसंती दिली होती. निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा अग्रसेर असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीने तब्बल २३५ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार २८८ पैकी २३६ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर आघाडी मिळाली आहे. महायुतीमध्ये भाजपाला १३७, शिवसेनेला (शिंदे) ५८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १५ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १४ जागा जिंकल्या आहेत.
शिवसेना कार्यकारणी बैठकीत मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना सर्वांधिकार
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मित्र पक्षासोबत चर्चा करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. तर सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गट नेते, मुख्य प्रतोद, प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वांधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला. या बैठकीला ऑनलाइन उपस्थित असलेले आमदार आणि कार्यकरिणीतील इतर सर्व सदस्यांनी या दोन्ही प्रस्तावांना अनुमोदन देऊन याबाबतचे सर्वांधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय एकमताने घेतला.