आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मुंबईतील केवळ ११ जागांवर उमेदवारी अर्ज भरले असून, २०१९ मध्ये ३० जागांवर लढलेल्या काँग्रेसची यंदा फक्त ११ जागांवर महाविकास आघाडीत बोळवण करण्यात आली आहे. उबाठा गटासोबत जागावाटपाच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्या तरी काँग्रेसच्या वाट्याला मुंबईत फक्त ११ जागा मिळाल्या आहेत, ज्यातील बहुतेक जागा ह्या भाजपच्या बालेकिल्ल्यांत आहेत. त्यामुळे या जागांवर काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पराभूत होणाऱ्या जागा काँग्रेसला दिल्या का याचीही कुजबुज सुरु झाली.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष वार्षा गायकवाड आणि आमदार अस्लम शेख यांनी काँग्रेसला अधिक जागा मिळाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न केले; परंतु मविवाच्या जागावाटपात काँग्रेसच्या हाती फार काही लागलं नाही. विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला कमी जागा मिळवल्यामुळे काही नेत्यांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे या ११ जागांमध्ये काँग्रेसच्या सध्याच्या चार आमदारांच्या जागांचा समावेश आहे. याशिवाय, काँग्रेसने बांद्रा पूर्वची जागा शिवसेनेला देऊन चांदीवलीची जागा घेतली, तर भायखळा आणि वर्सोवा या जागांवरील आपला दावा सोडला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट मुंबईत ३ जागा लढत आहे.