उत्तरभारतीय तरुण रोजगारासाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात येत असतात. याच मुद्द्यावरुन वादही झाले आहेत. या वादाचा नवा अंक आता पहायला मिळण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवलेलं पत्र आहे. या पत्रात कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशातील शाळांत मराठी शिकवण्याची विनंती केली आहे.उत्तरप्रदेशातील तरुणांना मराठी येत असेल तर त्यांना मराठीत सरकारी नोकरी मिळण्यास सोप होईल. असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील सूचना योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचाराधीन आहे. वाराणसीत प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कृपाशंकर सिंह हे गेली 50 वर्षांहून अधिक काळ मुंबईत राहतात आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा जो अनुभव आहे त्यानुसार, उत्तरप्रदेशातून अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्रात नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठी येतात. मात्र, मराठी भाषेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्या हेतूने कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिलं आहे.