पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असून विदर्भातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्ट दिल्याने समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घातली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल व त्यानंतर समुद्रकिनारी जाऊ नये अशी सूचना महापालिकेनं दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्नशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.