रायगड: पैशांचा पाऊस पाडण्यासाठी रोहा तालुक्यातील धामणसई गावातील एका खाजगी शाळेत जादूटोणा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार काल उशीरा उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील एकूण सात जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.
धामणसई गावातील एका खाजगी लहान मुलांच्या शाळेत पैशाचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने, रत्नागिरीहून चार ते पाच जणांच्या टोळक्याने शाळेमध्ये फुलं, अबीर, गुलाल, बिबवा ,लिंबू ,टाचण्या व काळी बाहुली अशा अघोरी वस्तूंच्या सहाय्याने लहान मुलांच्या शाळेमध्ये पूजन करून गावातील स्मशानात सुद्धा अशाच पद्धतीने पूजा केली. त्यानंतर त्यांनी गावातील मारुती मंदिरामध्ये नारळ फोडले.
हा सर्व प्रकार आपल्या गावात चालला आहे, हे पाहून येथील ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारले असता त्यांनी उडवा उडवी ची उत्तर दिली यानंतर ग्रामस्थांनी रत्नागिरीहून आलेल्या सहाजणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर कोलाड येथून एकाला रोहा पोलिसांनी ताब्यात घेऊन 134/ 23 कलम 3 असा गुन्हा दाखल केला आहे.