नवी दिल्ली : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळवला जात आहे. त्याच दरम्यान न्यूझीलंडमधील एका सामन्यातून ही आनंदाची बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेवर 2 गडी राखून कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे आणि यासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 फायनलसाठी पात्र ठरली आहे.
इंदूर कसोटीत भारताच्या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे समीकरण बिघडले होते. यामुळे भारताचे अवलंबित्व श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी सामन्यावर होते. श्रीलंका सध्या न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत होती. त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी मालिका 2-0 ने जिंकणे आवश्यक होते. या कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेने 355 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 373 धावा केल्या. तर, श्रीलंकेने दुसऱ्या डावात पलटवार करत 302 धावा केल्या, त्यात अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाचा समावेश होता. अशा परिस्थितीत श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडने शेवटच्या षटकापर्यंत सामना बरोबरीत ठेवला आणि अखेर विजय मिळवला. यामुळे भारताचे फायनलचे तिकीट कंन्फर्म झाले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ ते ११ जून या कालावधीत होणार असून १२ जून रोजी या सामन्यासाठी राखीव जागाही ठेवण्यात आली आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी भारताला न्यूझीलंडकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.