युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन तात्काळ मागे घेतलं आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे. मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर बराच वाद झाला होता. त्यानंतर जागतिक कुस्ती महासंघाला हस्तक्षेप करावा लागला.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. दरम्यान निलंबनाचा आढावा घेण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत युनायटेड वर्ल्ड रेसलिंग अधिकाऱ्यांनी काही अटी घालत निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाला त्यांच्या ऍथलीट आयोगाच्या निवडणुका पुन्हा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निवडणुका १ जुलै २०२४ नंतर कोणत्याही वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान घेतल्या जातील. WFI ताबडतोब युनायटेड वर्ल्ड रेसलिंगला लेखी गॅरंटी देईल की सर्व कुस्तीपटूंना सर्व WFI स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक खेळ आणि इतर कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणताही भेदभाव न करता भाग घेण्याची परवानगी दिली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.