टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला बॉक्सर्सने आपली विजयी कामगिरी सुरुच ठेवली आहे. आधी मेरी कोम आणि लवलीना यांनी आपआपले पहिले विजय मिळवल्यानंतर आज बॉक्सर पुजा रानीनेदेखील विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे आणखी एक सामना जिंकताच पुजा उपांत्य फेरीत पोहचेल. ज्यामुळे तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल.
एकीकडे पुरुष बॉक्सर काही खास कामगिरी करु शकले नसताना महिला बॉक्सर मात्र उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. भारताचे तिन्ही पुरुष बॉक्सर पहिल्याच सामन्यात बाहेर गेले आहेत. तर तिन्ही महिला बॉक्सर्सनी पहिला सामना खिशात घातला आहे. पुजाने 75 किलोग्राम वर्गात अल्जीरियाची बॉक्सर इचराक चाइब हिला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
पूजाने पहिले दोन्ही डाव आक्रमक खेळ दाखवत पूर्ण केले. तिने चाइबला पलटवार करायला संधी दिलीच नाही. आपल्या राष्ट्रीय अनुभवाचा पुरेपूर वापर करत पुजाने सामन्यातील पहिले दोन डाव खिशात घातले.