टोकियो ऑलिम्पिकचा उद्या सहावा दिवस आहे. या दिवशीच वेळापत्रकानुसार चाहत्यांना आता लवकर उठावे लागणार आहे. कारण बहुतेक सामने सकाळी लवकर सुरू होणार आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींना सकाळी 6 वाजल्यापासून टीव्ही, मोबाईलसमोर ठाण मांडून बसावे लागणार आहे.
दरम्यान ऑलिम्पिक सुरू झाल्यानंतर दुसर्याच दिवशी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकून दिले. त्यानंतर आतापर्यंत एकाही क्रीडा प्रकारात भारताला एकही पदक मिळवता आलेले नाही.
- हॉकी :-महिलांच्या पूल ए मध्ये भारताचा सामना ग्रेट ब्रिटनशी होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे.
- बॅडमिंटन :-पी.व्ही. सिंधू बॅडमिंटनच्या महिला एकेरीत तिचा दुसरा सामना खेळणार आहे. सकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. याशिवाय पुरुष एकेरीत बी. साईप्रणीतही त्याचा दुसरा सामना खेळणार आहे. हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे.
- तिरंदाजी (वैयक्तिक) :-पुरुष गटात तरुणदीप राय (सकाळी 7.31 वाजता) आणि प्रवीण जाधव (दुपारी 12.30 वाजता), तर महिला गटात दीपिका कुमारी (दुपारी 2:14 वाजता) आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
- रोईंग :-अर्जुन लाल आणि अरविंद सिंग पुरुष डबल स्कल्सच्या उपांत्य फेरीत उतरतील. हा सामना सकाळी 8 वाजता होणार आहे.
- सेलिंग :-के.सी. गणपती आणि वरुण ठक्कर पुरुषांच्या स्किफ 49 ईआरमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करतील. हा सामना सकाळी 8:35 वाजता सुरू होईल.
- बॉक्सिंग :-महिला बॉक्सर पूजा राणी 75 किलो वजनी गटात राउंड ऑफ 16 मध्ये खेळताना दिसेल.