नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे अनेक दिवस आंदोलन सुरु होते. आंदोलक कुस्तीपटूंची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली होती. यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया रेल्वे ड्युटीवर परतले आहेत. यामुळे कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतल्याची चर्चा रंगली आहे. परंतु, साक्षीने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
कुस्तीपटूंनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर आज साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया रेल्वे ड्युटीवर परतले आहेत. यानंतर साक्षी मलिकने कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त होते. मात्र, साक्षी मलिकने या वृत्तांचे खंडन केले आहे. न्यायाच्या लढ्यात आमच्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि मागे हटणार नाही, असे साक्षी मलिकने म्हंटले आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे, असेही तिने सांगितले आहे.
दरम्यान, विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. हे कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याआधी जानेवारीमध्येही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात धरणे आंदोलन केले होते.