पुणे| आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक जमा झाले आहे. पुनीत बालन ग्रुपच्या रुतुजा भोसले हिने रोहन बोपन्ना समवेत टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले.
भोसले आणि बोपन्ना या भारतीय जोडीने अंतिम फेरीत तापेई जोडीचा 2-6, 6-3, 10-4 असा पराभव केला. या जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये भोसले आणि बोपन्ना या जोडीने शानदार पुनरागमन करत तापेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा 10-4 असा पराभव करत सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर दोघांमधील निर्णय सुपर टाय ब्रेकमध्ये घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत 10-4 असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.पुण्याच्या ऋतुजा भोसले हीचा पुनीत बालन ग्रुपशी सहकार्य करार झाला आहे. या करारानुसार या ग्रूपकडून भोसले हिला खेळासाठीचे सर्वोतोपरी मदत केली जाते.
टेनिस सोडण्याचा विचार अन् बालन यांचे पाठबळ
वर्षभरापूर्वी वाढत्या खर्चाच्या आर्थिक विवंचनेमुळे ऋतुजा ही टेनिस सोडण्याच्या मनस्थितीत पोहचली होती. मात्र, पुनीत बालन ग्रुपने तिला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऋतुजा हिने पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर तिने आयटीएफ एकेरीचे एक आणि दुहेरीचे तीन जेतीपदे पटकवली. त्यांनंतर आता थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. केवळ पुनीत बालन ग्रुप यांच्या पाठबळामुळेच ऋतुजा या यशापर्यंत पोहचू शकली असल्याची भावना व्यक्त करत तिच्या कुटुंबियांनी पुनीत बालन यांचे आभार व्यक्त केले आहे.
आमच्या ग्रुपची खेळाडू ऋतुजा भोसले आणि तिचा सहकारी रोहन बोपन्ना या जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले याचा मनस्वी आनंद वाटतो. या जोडीने केवळ भारताचे नाव उज्वल केले आहे. ऋतुजा सारखी प्रतिभावंत खेळाडू पुनीत बालन ग्रुपशी जोडली आहे याचाही आम्हाला अभिमान वाटतो, असे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन म्हणाले आहे.