नवी दिल्ली : गतविजेत्या इंग्लंडला विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ड्वेन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या जोडीने शानदार शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने अवघ्या 36.2 षटकात 1 गडी गमावत 283 धावा करत सामना जिंकला.
न्यूझीलंडसमोर विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य होते. इंग्लंडच्या प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. न्यूझीलंडला पहिला धक्का 10 धावांवर बसला. विल यंग एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर ड्वेन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी इंग्लंडला एकही संधी दिली नाही.
ड्वेन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २७३ धावांची अखंड भागीदारी झाली. ड्वेन कॉनवे 121 चेंडूत 152 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि 3 षटकार मारले. रचिन रवींद्रने 96 चेंडूत 123 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचवेळी इंग्लंडसाठी केवळ सॅम कुरनला यश मिळाले.
तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 282 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक धावा केल्या. जो रूटने 86 चेंडूत 77 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांना २-२ यश मिळाले. रचिन रवींद्रने हॅरी ब्रूकला बाद केले.