Mohammed Shami Arjuna Award : नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची सांगता झाली. वर्ल्ड कप अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारली. मात्र एका पराभवाने टीम इंडियाला वर्ल्ड कप गमवावा लागला. मात्र टीम इंडियाने त्याआधीच्या 10 सामन्यांमध्ये सर्व संघांवर एकतर्फी विजय मिळवला.
क्रीडा क्षेत्रातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणार्या अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोहम्मद शमीच्या नावाची क्रीडा मंत्रालयाला शिफारस केली आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीची कामगिरी लक्षवेधी ठरली होती. या कामगिरीमुळे त्याच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या साखळी सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यातून शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. त्याने केवळ सात सामन्यांमध्ये तब्बल 24 विकेट घेतल्या होत्या. तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज ठरला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेत तीनवेळा 5 पेक्षा अधिक बळी घेण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर नोंदवला होता.
मोहम्मद शमी याने भारतीय क्रिकेट संघासाठी 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 229, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 195 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 24 विकेट आहेत.