चीनमध्ये सुरु असेलल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने अंतिम सामन्यात इराणचा 33-29 असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली.
या सामन्यात काहीसा वाद झाला त्यामुळे सामन्याला देखील विलंब झाला. मात्र शेवटी निर्णय हा भारताच्या बाजूने देण्यात आला. तासाभराच्या वादानंतर शेवटी खेळ पुन्हा सुरु करण्यात आला आणि भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर पडलीये. हा सामना जिंकून यंदाचा आशिया स्पर्धांमधील कबड्डीचा किताब हा भारताने गतविजेत्या इराणचा पराभव करुन आपल्या नावावर करुन घेतला आहे.
भारताने गाठला 104 पदकांचा टप्पा
भारताच्या खेळाडूंनी आशियाई स्पर्धांमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यामध्ये 104 पदकं सामील झाली आहेत. यामध्ये 28 सुवर्ण, 35 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे.पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर कायम असून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 100 पदकांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.