नवी दिल्ली : ईशा जाधव हिने मिळवलेल्या सुवर्णपदकासह महाराष्ट्राने ॲथलेटिक्स मध्ये चार पदकांची कमाई केली. शिवम लोहोकरे याने भालाफेकीत रौप्य पदक, तर ऋषिप्रसाद देसाई याने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. अनिकेत माने याने उंच उडीत कांस्यपदक पटकाविले.
वसई येथील खेळाडू ईशा हिने खेला इंडिया स्पर्धेतील पदार्पणातच सोनेरी कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले. तिने चारशे मीटर्स धावण्याची शर्यत ५५.९५ सेकंदात पार केले. यापूर्वी तिने राष्ट्रीय युवा स्पर्धेत सुवर्णपदक तर आशियाई युवा स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. ती विरार येथे संदीप सिंग लठवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज चार तास सराव करीत आहे.
अनिकेतची पदकांची हॅट्ट्रिक
कोल्हापूरचा अनिकेत माने याने उंच उडीत कास्यपदक जिंकून खेलो इंडिया स्पर्धेतील स्वतःची पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. 2021 मध्ये झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याला कास्य पदक मिळालं तर गतवर्षी त्याने सुवर्ण कामगिरी केली होती. यंदा फारसा सराव नसतानाही त्याने तिसरे पदक जिंकले. त्याने १.९८ मीटर्स पर्यंत उडी मारली.
अनिकेत याचे वडील सुभाष हे स्वतः उंच उडीतील माजी राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्याला या क्रीडा प्रकाराचे बाळकडू आपल्या वडिलांकडूनच मिळाले आहे. अनिकेत याला दोन महिन्यांपूर्वी पाठीच्या दुखण्याचा त्रास होत होता. येथील स्पर्धेतील सहभागाबाबत तो शासंक होता. महाराष्ट्राला या खेळात पदक मिळवण्याच्या जिद्दीने त्याने सराव केला आणि कौतुकास्पद कामगिरी यापूर्वी त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.
भालाफेकीत शिवमला रौप्य
भालाफेकी मध्ये शिवम लोहोकरे याने रौप्य पदक पटकाविले. त्याने ६७.६२ मीटर्स पर्यंत भालाफेक केली. तो पुण्यामध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे सराव करीत आहे. या स्पर्धेत त्यांना प्रथमच भाग घेतला होता. आयत्यावेळी या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती तरीही त्याने जिद्दीने येथे चांगली कामगिरी करीत महाराष्ट्राच्या पदक तालिकेत आणखी एक पदकाची भर घातली.
ऋषीप्रसादची रूपेरी कामगिरी
महाराष्ट्राच्या ऋषी प्रसाद देसाई याने शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. त्याने हे अंतर १०.६७ सेकंदात पार केले. चुरशीने झालेल्या शर्यतीत त्याने सुवर्णपदक जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्याला निसटता पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.