कॅपेटन कूल म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी (M. S. Dhoni) हा केवळ चेन्नईच्या संघाचाच नव्हे तर भारतीय संघाचाही सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक राहीला आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्यानंतर धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळत आहे. आता धोनीच्या चाहत्यांना धोनीला खेळताना पाहण्याची संधी म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. आता धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. ती म्हणजे, चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनी विराजमान होणार आहे.
कोणी व काय माहिती दिली?
चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या संदर्भआत आपली व संघाची भुमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, "महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा कर्णधार असेल. या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही." काशी विश्वनाथन यांच्या या वक्तव्यामुळे आता धोनी व चेन्नई दोन्हीच्या चाहत्यांमध्ये नवी उर्जा येणार आहे.
मागील वर्षी जडेजाने केलं होतं नेतृत्त्व:
मागील हंगामामध्ये धोनीने स्वत: रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. परंतु, या मोसमात संघाची कामगिरी अजिबात कौतुकास्पद झाली नाही. खराब कामगिरीनंतर जडेजाने मोसमाच्या मध्येच कर्णधारपद सोडलं होतं. जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 8 सामने खेळले. त्या 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामने चेन्नईला जिंकता आले. त्याचवेळी जडेजाच्या कामगिरीवरही परिणाम झाला होता. उत्तम अष्टपैलू खेळाडू असलेला जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत तो फ्लॉप दिसत होता. त्यानंतर स्वतः जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवले. तरीही, मागील हंगामात चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता.