ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयने या माहितीला दुजोरा दिला आहे. जसप्रीत बुमराह विश्वचषक खेळण्यासाठी योग्य नसल्याचे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे. बीसीसीआय लवकरच बुमराहच्या बदलीच्या दुसऱ्या खेळाडूचे नाव आयसीसीकडे पाठवणार आहे.
बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे, “वैद्यकीय संघाने माहिती दिली आहे की जसप्रीत बुमराह आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी फिट नाही. बुमराहच्या फिटनेसबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. बुमराह याआधी केवळ पाठदुखीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून बाहेर पडला होता.
काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहची दुखापत गंभीर असून तो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचे समोर आले होते. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की, बुमराहच्या फिटनेसवर लक्ष ठेवले जात असून तो विश्वचषक खेळू शकतो. परंतु तो आता विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.