क्रिकेट जगातील दिग्गज खेळाडू आजपासून मैदानात उतरणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा सीझनआजपासून (10 सप्टेंबर) सुरु होणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत पार पडणाऱ्या या सामन्यांतील आज पहिला सामना कानपूर येथे खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या नेतृत्त्वाखाली आज इंडिया लीजेंड्सचा संघ मैदानात उतरणार आहे. समोर दक्षिण आफ्रिका लीजेंड्सचा संघ असणार आहे. त्यांंचं नेतृत्त्व आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू जॉन्टी रोड्स करणार आहे.
इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यातील स्पर्धेतील हा पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल.
कुठे आहे सामना?
हा सामना कानपूर येथील ग्रीन पार्क मैदानात खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
इंडिया लीजेंड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यातील हा सामना कलर्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच वूट (Voot) आणि जिओ टीव्ही अॅपवरही (Jio TV) सामना पाहता येईल.
22 दिवस 4 शहरांमध्ये होणार स्पर्धा
ही स्पर्धा 10 सप्टेंबर ते 22 दिवस कानपूर, रायपूर, इंदूर आणि डेहराडून या देशातील 4 शहरांमध्ये खेळवली जाईल. स्पर्धेतील पहिला सामना कानपूरमध्ये होणार आहे, तर उपांत्य आणि अंतिम दोन्ही सामने रायपूरमध्ये होणार आहेत. या दोघांशिवाय इंदूर आणि डेहराडूनमध्येही स्पर्धा होणार आहे.
न्यूझीलंडचा संघ प्रथमच सहभागी
यावेळी न्यूझीलंड दिग्गजांचा संघही या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या मालिकेत भारत आणि न्यूझीलंड व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंडचे संघही सहभागी होणार आहेत, ही मालिका देशात आणि जगभरातील रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता आणण्याच्या मुख्य उद्देशाने खेळली जाणार आहे.