आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना खेळला जाणार आहे. यात अर्जेटिना की फ्रान्स कोण पटकावणार विश्वविजेतेपद याकडे साऱ्या फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे. फ्रान्स आणि अर्जेटिना हे दोनही संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्नात आहेत. फ्रान्सने १९९८ आणि २०१८मध्ये, तर अर्जेटिनाने १९७८ आणि १९८६मध्ये विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
फ्रान्सच्या संघाने गेल्या दशकभरात फुटबॉल विश्वावर वर्चस्व गाजवले आहे. दिदिएर डेशॉम्प यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने गतविश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. आता १९६२ नंतर सलग दोन विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरण्याचीही फ्रान्सला संधी आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मेसी पुढे आहे.
फ्रान्सविरुद्धचा सामना हा मेसीच्या विश्वचषक कारकीर्दीतील विक्रमी २६वा सामना असेल. आठ वर्षांपूर्वी जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यात मेसी आणि अर्जेटिनाला पराभव पत्करावा लागला होता.
संभाव्य संघ
अर्जेटिना : एमिलियानो मार्टिनेझ; नाहुएल मोलिना, निकोलस ओटामेन्डी, ख्रिस्टियन रोमेरो, मार्कोस अकुनया; रॉड्रिगो डी पॉल, लिआन्ड्रो पेरेडेस, एन्झो फर्नाडेस, अलेक्सिस मॅक अॅलिस्टर; लिओनेल मेसी, ज्युलियन अल्वारेझ
* संघाची रचना : (४-४-२)
फ्रान्स : ह्यूगो लॉरिस; ज्युल्स कुंडे, राफेल वरान, इब्राहिमा कोनाटे, थिओ हर्नाडेझ; ऑरेलियन टिचोयुमेनी, अॅड्रियन रॅबिओ; ओस्मान डेम्बेले, अॅन्टोन ग्रीझमान, किलियन एम्बापे; ऑलिव्हिएर जिरूड.
* संघाची रचना : (४-३-३)