नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. त्याच्यासह दीपक पुनिया आणि साक्षी मलिक यांनीही सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर, अंशू मलिक हिनं रौप्यपदक पटकावलं. व दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल यांना कांस्यपदक मिळवण्यात यश आले. यामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या आता २६ झाली असून त्यात ९ सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने भारताला कुस्तीमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता बजरंगला ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात त्याने सहज सुवर्ण जिंकले. अंतिम सामन्यात बजरंगला कॅनडाच्या लचलान मॅकनिलाचे आव्हान होते. हा सामना ९-२ असा जिंकून बजरंगने सुवर्णपदक जिंकले.
दीपक पुनियाने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाइल कुस्तीच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात दीपकने पाकिस्तानी कुस्तीपटू मोहम्मद इनामचा ३-० असा पराभव केला. आणि सुवर्ण पदक मिळवले.
साक्षी मलिकने महिलांच्या 62 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या अना गोडिनेझ गोन्झालेझचा 4-4 असा पराभव केला. साक्षी मलिक एका क्षणी 4-0 ने पिछाडीवर होती. पण, एकाच डावात तिने कॅनडाच्या खेळाडूला बाद केले. व सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
अंशू मलिकने कुस्तीत रौप्यपदक मिळवले आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अंशू मलिकचा नायजेरियाच्या ओडुनायो फोलासाडेशी सामना झाला. परंतु, अंशूला ओडुनायोकडून 3-7 ने पराभव झाला. तरीही अंशूने शेवटच्या सेकंदात गुण मिळवून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण, तो पुरेसा झाला नाही. यामुळे अंशूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.