केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता राज्यातील ऑक्सिजनचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. जवळ जवळ 97 मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू राज्याला मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत हा पुरवठा होण्याची शक्यता आहे.
राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. काल नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता केंद्र सरकारला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी साकडं घातलं आहे.
नितीन गडकरी यांनी विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून 97 मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत विशाखापट्टणम येथून पुरवठा सुरू होईल, यामुळे विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तसेच प्राणवायूची मागणी बघता शहरातील ५० खाटापेक्षा जास्त असलेल्या रुग्णालयांनी हवेतून प्राणवायूची निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केले आहे.