मुंबई - दोन वर्षांच्या कोरोना लाटेनंतर प्रथमच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. सात महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप, वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापतं राहिलंय. शिवसेनेचे तुकडे झाले आणि दोन गट जन्माला आले. पहिला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे'. या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे. दुसऱ्या पक्षाचं नाव आहे 'बाळासाहेबांची शिवसेना' आणि या पक्षाचं नेतृत्व करतायंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार, एवढं नक्की.
आता 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. या अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. उद्धव ठाकरेंची प्रकृती आता उत्तम आहे. 17 डिसेंबरला मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाच्या तयारीत ते बिझी आहेत. पत्रकार परिषदा घेत आहेत, शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहेत. म्हणूनच हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपूरला जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आणि 40 आमदार शिंदेंसोबत गेल्यानंतर 29 जून 2022 रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुखमंत्रिपदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. पुढे मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा सहभाग नव्हता. आता हिवाळी अधिवेशनात नागपुरात म्हणजे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गावात होतंय. म्हणूनच उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहून सरकारला सळो की पळो करून सोडणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.