नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्याविरोधात देशभर शनिवारी सुरु झालेली निदर्शनं आजही अनेक ठिकाणी सुरुच आहेत. दिल्लीपासून सुरु झालेले निदर्शनांचे लोण कर्नाटकपर्यंत पोहोचले असून गोंधळ आणि दगडफेक सुरु आहे. यामध्ये 12 पोलीस आणि 12 नागरिक जखमी झालेले आहेत.
भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्माच्या प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. दिल्लीत शुक्रवारच्या नमाजानंतर जमावाने रस्त्यावर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. हळूहळू या प्रदर्शनाची व्याप्ती १२ राज्यांमध्ये विस्तारली. दिल्लीपासून कर्नाटक आणि उत्तर प्रदेशपासून बंगालपर्यंत अनेक शहरांमध्ये गोंधळ आणि दगडफेक झाली आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांच्या पोलिसांना सतर्क आणि सज्ज राहण्यास सांगितले आहे.
तर, झारखंडच्या रांचीमधील हिंसाचारात 2 ठार झाले असून 12 पोलीस आणि 12 सामान्य लोक जखमी झाले आहेत. तसेच, पश्चिम बंगालच्या हावडामध्ये निदर्शने झाली होती, त्या ठिकाणी जाणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजुमदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, पश्चिम बंगालच्या हावडामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशातल्या मोरादाबाद आणि हैदराबादमध्ये पोलिसांनी निदर्शकांवर जरब बसावायासाठी लाँग मार्च काढून एक प्रकारे तंबीच दिली. उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये आजही हिंसक घटना घडल्या आहे. याप्रकरणी 68 जणांना अटक करण्यात आली असून तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, कर्नाटकातल्या बेळगावमध्येही मुस्लिमांनी निदर्शने करुन नुपूर शर्माच्या वक्तव्यांविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
दिल्लीत घोषणाबाजी
दिल्लीतील जामा मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी सुमारे 1500 लोक जमले होते. नमाजानंतर जवळपास 300 लोक बाहेर आले आणि त्यांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जामा मशिदीच्या शाही इमामांनी म्हणाले की, आमच्या बाजूने निषेधाचे आवाहन करण्यात आले नव्हते. नमाज पढून नमाजी बाहेर आले आणि अचानक घोषणाबाजी करू लागले. आंदोलक कोण आहेत हे आम्हाला माहित नाही. मला वाटते की तो एआयएमआयएमचा सदस्य आहे किंवा ओवेसीचा माणूस आहे, असे त्यांनी सांगितले आहे.