विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, व्वा रे मोदी सरकार 3.O दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या यवतमाळात मोदींच्या कार्यक्रमावर २२ कोटींचा खर्च. यवतमाळ जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी खरीप हंगामाची आणेवारी ४८ टक्क्यांपेक्षा कमी आली. दुष्काळी परिस्थिती असल्याचे सिद्ध झाले. या विपरित परिस्थिती शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या याच यवतमाळ जिल्ह्यात सरकारने जनतेच्या ५० कोटींहून अधिकच्या निधीचा चुराडा केला.
एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी यवतमाळजवळील डोरलीत २८ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी २२ कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला. या मेळाव्यासाठी आलेल्या व्हीआयपींसाठी १९ लाख २६ हजार रुपयांचे हॉटेल केले. यावरून आरोप झाल्यानंतर हे बिल १७ लाख ३२ हजार रुपये करण्यात आले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कामाच्या खर्चाचे बजेट पाहून अचंबित झालेल्या जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे चौकशी सोपविली. कार्यक्रमानंतर काढलेल्या निविदा रद्द करण्याचे आदेश दिले. खर्चाचा आढावा घेण्याचे काम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजवर सोपविले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कार्यक्रमस्थळाचे व्हिडीओ पाहून व सभास्थळी भेट देऊन खर्चाचा अंदाज सादर केला. तीन महिन्यांहून अधिक काळापासून हा घोळ सुरू आहे. जबाबदारी कुणीही अधिकारी घेण्यास तयार नाही. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध खर्चाचा अहवाल मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. ‘फाइल टू फाइल’ प्रवास सुरू आहे. निवडणूकपूर्व प्रचारासाठी कार्यक्रम घेऊन कोट्यवधी उधळणाऱ्या याच सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पैसा नाही. आता हेच बघा. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.