नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यापासून पासून चीनचं लक्ष सध्या तैवानवर आहे. चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढला तर, तर केवळ दोन्ही देशांसाठीच नाही, तर जगासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. जगावर या संभाव्य युद्धाचे भयावह परिणाम होतील अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जातेय. तज्ज्ञांच्या मते तैवानवर चीनने हल्ला केल्यास संपूर्ण जगाला त्याचा मोठा तोटा होणार आहे. भारतासह इतर अनेक देशांना या संघर्षाचा थेट फटका बसणार आहे. कारण तैवान हा मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टरची निर्मिती करणारा देश आहे.
भारतालाही सेमीकंडक्टरची टंचाई भासण्याची शक्यता
चीन-तैवान तणावाच्या पार्श्वभूमीवर, इंडियन फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धानंतर जग आता तैवान-चीन युद्धाच्या छायेखाली आहे. कारण हे युद्ध झाल्यास सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा धोका पुन्हा एकदा वाढेल. कारण तैवानची सेमीकंडक्टर चिप निर्माता कंपनी TSMC च्या निर्मितीवर मोठा परिणाम होणार असून, कंपनीचं काम ठप्प होऊ शकतं.
जागतिक बाजारपेठेतील 92 टक्के पुरवठा एकट्या तैवानमधून
केवळ मोबाईल कंपन्यांनाच नाही, तर कार कंपन्यांनाही या संघर्षाचा फटका बसणार आहे. तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर निर्माण करणारी कंपनी आहे. TSMC एकेकाळी जागतिक बाजारातील मागणीच्या 92 टक्के मागणी पूर्ण करत होती, यावरुन सेमीकंडक्टर्सच्या बाबतीतलं कंपनीचं जगातलं वर्चस्व दिसून येतं. इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, स्मार्टफोन आणि कार सेन्सरमध्ये सेमीकंडक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आजकाल जगात जी काही वाहनं बनतात, त्या जवळपास सर्व वाहनांमध्ये सेमी कंडक्टर वापरला जातो.