Uddhav Thackeray Press Conference : येत्या दोन तीन महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा येतील. त्यानंतर इतर राज्यांच्या निवडणुका येतील. आता मोदी सरकार हे एनडीए सरकार झालं आहे. हे सरकार आता किती दिवस चालेल, हा एक मोठा प्रश्न आहे. नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती असं आमच्याबद्दल म्हटलं होतं. आता जे काही दिल्लीत झालं आहे, ते नैसर्गिक आहे अनैसर्गिक, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. देशाची जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली. हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळी मिळालं, असं आपण मानतो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र आहोतच. पण इतर घटक पक्ष आणि सामाजिक संघटना यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. यात मराठी बांधव आहेतच. हिंदू, मुस्लीम, ख्रच्छन, शीखही आहेत. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्यांच्या डोळ्यादेखत लुटली जात असेल, तर अशावेळी मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल का? मुंबई आणि महाराष्ट्राला लुटणाऱ्याला मराठी माणून झोपेतही मत देणार नाही. अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव झाली नसेल, तर मग त्यांना निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल.
भाजपविरोधात कुणी लढू शकत नाही, असं वातावरण संपूर्ण देशात होतं. महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिला आणि भाजपला दाखवून दिलं. म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतोय. आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवेच आहेत. निर्भय बनो सामाजिक संघटना, यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे, हेमंत देसाई, प्रशांत कदम, अशोक वानखेडे, रवीश कुमार यांनी धाडसाने जनतेचे प्रश्न मांडले. त्यांनी नि:पक्षपातीपणे बाजू मांडली. त्यामुळे जनतेला सुद्धा सत्य काय आहे, हे कळत गेलं. ही लढाई फार विचित्र होती.
संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. मला अभिमान आहे, मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त, बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमींनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला कौल दिला आहे. ही एक जागा आता देशाला आली आहे. हा विजय अंतिम नाहीय. ही लढाई सुरु झाली आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.