राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
दहिसर, मुलुंड पूर्व आणि पश्चिम, ऐरोली आणि वाशी, आनंदनगर या मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोलमाफी करण्यात आली आहे. विधानसभा आचारसंहितेआधी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादा भुसे म्हणाले की, आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने जे काही जड वाहनं आहेत हि सोडून इतर सर्व वाहनांना आज रात्री बारा वाजल्यापासून टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय केलेला आहे.
मला वाटतं मुंबईकरांना याच्यातून मोठा दिलासा मिळेल आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनांना याच्यातून दिलासा मिळणार आहे. असे दादा भुसे म्हणाले.