दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप ही केले गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात पार पडला तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे- कुर्ला संकुलात झाला.
दसरा मेळावा पाहण्यासाठी लाखो लोक मुंबईत आले होते. त्यात एक मोठी बातमी म्हणजे मुंबईतील लोकलमध्ये बीकेसीवरील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील भाषण थेट एलईडी टिव्हीवर दाखविण्यात आले होते. परवानगी नसतानाही शिंदेंच्या सभेचे थेट प्रक्षेपण लोकलमध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटं दाखवण्यात आले होते. पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी एलईडी टिव्ही बसवण्यात आले आहेत.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं थेट प्रक्षेपण लोकलमध्ये दाखवल्याने पश्चिम रेल्वेने कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे. याबाबत सोशल मीडियावरुन अनेकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दखल घेतली. कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. शिंदे यांच्या सभेच्या प्रक्षेपणाची परवानगीही रेल्वेकडून देण्यात आली नव्हती. अशी माहिती मिळत आहे.