‘वर्षा’वर रात्री उशिरा पार पडली मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. दीड ते पावणे दोन तास शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली. या बैठकीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये प्रभादेवी येथे झालेल्या वादावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांदरम्यान झालेल्या वादामध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून त्याप्रकरणी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात ठाकरे व शिंदे गटात झालेल्या वादातून शनिवारी ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटातील शाखाप्रमुखाला मारहाण केली. या वेळी झालेल्या वादानंतर सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या बदल्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवीमध्ये झालेला वाद आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था या विषयांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईवर मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंचं वर्चस्व आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या बदल्या करताना शिंदे गट कशाप्रकारे अधिकारी नियुक्ती करणार याकडे लक्ष लागलेलं आहे.
राज्यामधील पोलिसांच्या रखडलेल्या बदल्या, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवीमध्ये झालेला वाद आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था या विषयांवर यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असून त्यांनी प्रभावदेवी प्रकरणाबरोबरच पोलिसांच्या बदल्यांच्या विषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. पोलिसांच्या बदल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल अशी शक्यता या बैठकीनंतर व्यक्त केली जात आहे.