Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Vikramsinghe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तडीच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्याला आता मंजूरी मिळाली आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे म्हणाले की, त्यांच्या राजीनाम्यामुळे देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, वादग्रस्त ठरलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajpaksa) यांनी शनिवारी राजधानीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढल्याचं वृत्त समोर आलं आहे. संरक्षण क्षेत्रातील एका सूत्राने ए. एफ.पी. या वृत्त संस्थेला याबाबत माहिती दिली आहे. त्यापूर्वी, काही व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलक त्यांच्या निवासस्थानामध्ये घुसून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचं दिसून आलं. अशा स्थितीत स्वत:ला धोका असल्याचं पाहून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. "राष्ट्रपतींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे." असं सूत्राने सांगितलं. संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याचंही, समोर आलं आहे.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिसांसह सात जण जखमी झाले आहेत. हजारो आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात घुसण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी लावलेले बॅरियर्स तोडले आहेत. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी निदर्शनांपूर्वी संचारबंदी उठवली. सरकारविरोधी निदर्शनं रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम प्रांतातील सात पोलिस विभागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नेगोम्बो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, नॉर्थ कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि कोलंबो सेंट्रल या भागांचा यामध्ये समावेश आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी ही घोषणा करताना पोलिस महानिरीक्षक (IGP) सीडी विक्रमरत्ने म्हणाले, "ज्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली, त्या भागात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरातच राहावं. संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल."