श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सिंगापूरला पोहोचताच राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी बुधवारी पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यापूर्वीच ते देश सोडून पळून गेले होते. इकडे श्रीलंकेत आंदोलक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम होते. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतलं होतं. त्याचवेळी मालदीवमधून ते सिंगापूरला रवाना झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष देशात असल्याच्या वृत्तावर मालदीवने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. गोटाबाया राजपक्षे यांना मालदीवमध्ये पलायन करताना भारताने कोणतंही सहकार्य केलं नव्हतं असं भारताने स्पष्ट केलं होतं. गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु बुधवारी त्यांच्या राजीनाम्याची कोणतीही बातमी नाही.
श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे सुरू झालेल्या या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केलं आहे. देशाची राजधानी कोलंबोसह विविध जिल्ह्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. श्रीलंकेत सरकारविरोधातील तीव्र निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपर्यंत देशव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला होता. कार्यकारी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. 14 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू होती.