सक्तवसुली संचलनालयानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald) समन्स बजावलं होतं. मात्र कोरोनासंसर्गामुळे ईडी (ED) चौकशीला हजर राहू न शकलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावले आहे. आज (21 जुलै) सकाळी सोनिया गांधींना चौकशीला हजर राहण्याचे समन्स आहे. कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या सोनिया गांधी या चौकशीला आज हजर राहणार आहेत. दरम्यान सोनिया गांधींच्या चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे, तर दुसरीकडे सोनिया गांधींची ईडीकडून तीन टप्प्यांमध्ये चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी ईडीच्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा करणार आहेत.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी
ईडी सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. सोनिया गांधी यांची इन कॅमेरा चौकशी केली जाणार आहे. सोनिया गांधी यांच्याकडून ईडी लेखी जबाब घेणार आहे. ईडीनं या प्रकरणाची फाईल २०१५ मध्ये बंद केली होती. मात्र, पुन्हा एकदा ईडी चौकशीला सुरुवात केली आहे.
काँग्रेस देशभर आंदोलन, पोलीस सतर्क
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. काँग्रेसकडून ईडीच्या विरोधात आंदोलन करण्यात येण्याची शक्यता असल्यानं पोलीस सतर्क झाल्या आहेत. काँग्रेस मुख्यालय २४ अकबर रोड येथे पोलिसांनी बॅरिकेटस लावले आहेत.
काय आहे प्रकरण?
'द असोसिएटेड जर्नल लिमिटेड' या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले 'नॅशनल हेरॉल्ड' हे वृत्तपत्र इ.स. २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या 'यंग इंडिया' कंपनीने इ.स. २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने 'नॅशनल हेराल्ड'ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. 'द असोसिएटेड जर्नल'ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. यंग इंडिया कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया आणि राहुल यांच्या नावावर असल्यामुळे प्रकरणाला महत्त्व आले आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती.
दरम्यान सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी केली जाईल. प्रश्नांच्या पहिल्या टप्प्यात, त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारले जातील ज्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते. या प्रश्नांमध्ये ती आयकर विभागात कर भरता का? त्यांचा पॅन क्रमांक काय आहे? देशात त्यांची कुठे-कुठे मालमत्ता आहे? परदेशात मालमत्ता कुठे आहे? त्यांची किती बँक खाती आहेत? कोणत्या बँकेत खाती आहात? दरम्यान सोनिया गांधींना आलेल्या या समन्समुळे काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झालेय. या समन्सविरोधात राज्यभर आज काँग्रेसचं आंदोलन आहे. मुंबईतही आज काँग्रेस नेते ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.