मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने आपले आमदार हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहेत. येत्या 10 जुन रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यातील २ जागांवर शिवसेनेनं उमेदवार दिला असून, आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी सेनेनं आपले आमदार हॉटेलात हलवले आहेत. वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर दोन लक्झरी बसेसच्या माध्यमातून आता सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
भाजपने देखील आपले आमदार आता ताज हॉटेलमध्ये हालवले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी, काँग्रेसचा प्रत्येकी एक असे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र जागा फक्त सहा आहेत. त्यामुळे ही निवणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. शिवसेनेचे संजय पवार निवडून येणार की भाजपचे धनंजय महाडीक हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.